जिल्ह्याला चार शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यातील दोन तर बळसोंडचेच आहेत, तर एक खापरखेडा व एक डिग्रसवाणीला सुरू आहे. त्यामुळे इतर ठिकाणी टँकर सुरू करण्यासाठी टँकरची निविदा मंजूर होण्याची प्रतीक्षा केली जात होती. ही निविदा मागच्या आठवड्यात अंतिम होईल, असे अपेक्षित होते. मात्र ही निविदा काही अंतिम झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून हिंगोली जिल्ह्यातील या गावांची पाणीटंचाईची ओरड कायम आहे. जिल्ह प्रशासनाकडे लोहरा, हातमाली, सावरखेडा, अंधारवाडी, माळधावंडा, पेडगाववाडी व जयपूर या गावांचे टंचाईत टँकर सुरू करण्याच्या मागणीचे प्रस्ताव पडून आहेत. मात्र अद्याप टँकर सुरू झाले नाहीत. त्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत.
अंधारवाडी येथील नागरिक तर दीड ते दोन किमी अंतरावरून पाणी आणत असून, या नागरिकांनी आता काय? पावसाळा सुरू झाल्यावर आम्हाला पाणी मिळणार आहे की काय? असा सवाल केला आहे. जर दीड महिन्यांपासून टँकरचा प्रस्ताव मंजूर होत नसेल, तर आमच्या गावाला कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना तरी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी तरुण सायकलवरून पाणी नेत आहेत, तर वृद्धांच्या डोक्यावरही पाण्याचा हंडा आला आहे. लहान मुले, महिलाही यातून सुटल्या नाहीत.