- इस्माईल जहागीरदार
वसमत: तालुका कृषी अधिकारी यांनी जलयुक्त शिवार योजनेचे अंदाज पत्रक सादर करण्यासंदर्भात मंडळ अधिकारी यांना सूचना देताच संतप्त मंडळ अधिकाऱ्याने कृषी अधिकाऱ्यावर खुर्ची फेकून मारली. एवढ्यावरच न थांबता हातात विट घेऊन अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी मंडळ अधिकाऱ्याने दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील कृषी कार्यालयात३१ मे रोजी सायंकाळी ४.४५ वा दरम्यान तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांच्या दालनात कुरुंदा मंडळाचे मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर सुरशेवाड हे कामानिमित्त आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी भिसे यांनी त्यांना जलयुक्त शिवार योजनेचे अंदाज पत्रक सादर करण्याबाबत सूचना केल्या. याचा राग आल्याने मंडळ अधिकाऱ्याने खुर्ची हातात घेत कृषी अधिकारी भिसे यांना फेकून मारली. त्यानंतर हातात विट घेऊन भिसे यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले. जीवे मारण्याची धमकी देत कार्यालयात तोडफोड केली.
या धक्कादायक घटनेनंतर कृषी कार्यालय परिसरात बघ्याची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी रात्री १०.२२ वाजे दरम्यान तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांनी शहर पोलीस ठाण्यात मंडळ अधिकारी यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, जमादार शेख हकीम करत आहेत.