हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका ३० वर्षीय तरुणास लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून खून केल्याची घटना २७ मे रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान घडली. गोपीचंद आव्हाड असे मृताचे नाव असून मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. तर दोघांचा तपास पोलिस घेत आहेत.
औंढा तालुक्यातील येळी येथे वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. त्यात मयत गोपीचंद आव्हाड आरोपी नमूद असल्याने या प्रकरणी त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून परतलेल्या गोपीचंद आव्हाड याच्याबाबत मागील प्रकरणावरून खुन्नस ठेऊन होते. रामप्रसाद आव्हाड यांनी २८ मे रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी अंकुश सोपान नागरे, मारोती पांडुरंग नागरे व बाबाराव सोपान नागरे या तिघांनी संगनमत करून गोपीचंद आव्हाड यास त्याच्या जुन्या घरासमोर काठीने जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
औंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांना घटनेची माहिती मिळताच सहकारी कर्मचाऱ्यांसोबत येळी येथे धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मयताचे भावाने दिलेल्या फिर्यादीवरून यातील तिन्ही आरोपीं विरोधात विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंकुश नागरे या आरोपीस अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहिरे हे करीत आहेत.