हिंगोली : डिटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरती व शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करण्यासाठी १० जुलै पासून राज्यव्यापी ‘डिग्री जलाओ’ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवत पदवीच्या सत्यप्रती जाळून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील शिक्षकांची भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे शिक्षक भरती तात्काळ सुरू करून विविध मागण्यांसाठी हे आंदोलन गुरूवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू केले आहे. आंदोलनासंदर्भात यापूर्वीच ५ जुलै रोजी शालेय शिक्षण विभागास निवेदनही दिले होते, परंतु निवेदनाची शासनाने दखल न घेतल्याने जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन जागा भराव्यात, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, ५०% मागासवर्गीय पदभरतीमधील कपात रद्द करावी. बीएमसीमधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी डीएड, बीएडधारक व शिक्षण सेवक घरी बसून आंदोलनात सहभागी झाले आहेत. असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोके यांनी सांगितले.