हिंगोली: सहयोग तत्वावर कारखाना देण्यासाठी सभासदांनी विरोध दर्शवताच टोकाई सहकारी कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सभासदांचे एक न एकता सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे संतप्त सभासदांनी सभा मंडपात थांबलेल्या संचालकांना घेराव घालत ठराव नामंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. सहयोग तत्वाचा ठराव मर्जीने मंजूर करत असाल तर ‘टोकाईचे’ सर्व सभासद आंदोलन छेडतील यास ‘टोकाई’ प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा संतप्त सभासदांनी दिला.
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर देण्यासाठी २१ जून रोजी सकाळी १०:३० वाजता अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी विशेष सभेत ‘टोकाईचे’ अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सभेस सुरूवात करताच हा कारखाना सहयोग तत्वावर देण्यासाठी अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहीती दिली. लगेच सभेतील सभासदांशी कोणताही विचारविनिमय न करत सहयोग तत्वासाठी ठराव मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. हा प्रकार पाहताच सभेस आलेले शेतकरी सभासद संतप्त झाले. सर्व सभासदांनी सहयोग तत्वाच्या ठरावास विरोध दर्शवताच अध्यक्ष जाधव यांनी सभेतून काढता पाय घेतला.
टोकाई सहकारी कारखान्याची विशेष सभा होणार असल्याचे पाहून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याच दरम्यान अध्यक्ष कारखान्यावरुन निघून गेले. ही बाब संतप्त सभासदांना नपटणारी होती. सभासदांनी सभा मंडपातील सर्व संचालकांना घेराव टाकीत सहयोग तत्वाचा ठराव नामंजूर असल्याचे सांगितले. तुम्ही सर्व संचालकांनी नामंजूर ठरावास पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. असे जर झाले नाही तर ‘टोकाई’साठी आंदोलन छेडण्यात येईल आणि कारखाना प्रशासन यास जबाबदार राहील, असा इशाराही सर्व सभासदांनी दिला.