हिंगोली : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभागात रस्ते व नाल्यांची सुविधा नाही. मागील पंधरा वर्षांपासून येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. याबाबत वेळोवेळी निवेदन सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मंगळवारी येथील महिलांनी तसेच युवकांनी पँथर ग्रुपच्या वतीने पालिकेवर थेट मोर्चा काढून निवेदन दिले.
आंबेडकर नगर भागात रस्ते नाहीत आणि नाल्यांची सुविधाही नाही. त्यामुळे पावसाळ्यात घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. चिमुकल्यांना शाळेत घेऊन जाणारा ऑटोरिक्षाही घरापर्यंत जात नाही, त्यामुळे मुलांना चिखलातूनच कसरत करत मार्ग काढावा लागतो. महिलांची चिखलामुळे नेहमीच फजिती होते. या भागात जागो-जागी चिखल आणि पाण्याचे डोह साचले आहेत, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु पालिका प्रशासन आणि संबंधित नगरसेवकही नागरिकांच्या समस्येकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यात आता पालिकेच्या वतीने भुमिगत गटार योजनेची शहरात कामे केली जात आहेत. खोदकाम झाल्यानंतर तेथे डागडूजी करून दिली जात आहे, परंतु सर्वात प्रथम आंबेडकर नगर प्रभागात भुमिगतची कामे झाली असली तरी अद्याप याठिकाणी साधा मुरूमही टाकला नाही. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंगळवारी या प्रभागातील संतप्त महिला व युवकांनी थेट मोर्चा काढून पालिका प्रशासनास निवेदन सादर केले.
आवश्यक सुविधा करून देता येत नसतील तर नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत असे मोर्चात सहभागी युवक व महिलांनी घोषणा दिल्या. या प्रभागातील रस्ते व नाल्यांचा प्रश्न न सोडविल्यास उपोषणाचा इशारा दिला. पालिका प्रशासना दिलेल्या निवेदनावर लिलाबाई खिल्लारे, शिलाबाई इंगोले, इंदूबाई धाबे, मीना चाटसे, चंद्रकला वाढवे, माया तपासे तसेच पँथर ग्रुपचे अध्यक्ष राहूल खिल्लारे, अविनाश इंगोले, स्वप्निल पुंडगे, शेख एजाज, शुभम थोरात यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.