हिंगोली: सेनगाव तालुक्यातील कडोळी व परिसरात मागच्या काही दिवसांपासून रोहिंची संख्या वाढली असून खरीप पिकांचे नुकसान करत आहेत. याबाबत वन विभागाला अनेकवेळा सांगण्यात आले. परंतु अद्यापही वन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या एक एकरातील कापसाची नासाडी झाली आहे. या भागात रोहिंबरोबर अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेत शिवारात वावरत आहेत.
एकीकडे पावसाने पाठ फिरविली आहे तर दुसरीकडे वन्यप्राणी पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम सुरु झाल्यापासून रोही, नीलगाय, वानरे, रानडुकरे आदी वन्यप्राणी कडोळी व परिसरातील पिकांची नासाडी करीत आहेत. वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येवून हल्ला करत आहेत, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. कडोळी येथील अशोक ओंकार जिरवणकर यांच्या गट क्रमांक ३२४ मध्ये त्यांनी कापसाची लागवड केली. कमी-जास्त पावसामुळे कापूसही चांगले आले. परंतु बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एक एकरात केली नासाडी...यावर्षी कापसासाठी भरपूर प्रमाणात मशागत केली. परंतु रोहिंनी बोंडांनी लगडलेल्या कापसाची नासाडी केली. त्यामुळे खरीप हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मशागत केल्यामुळे कापसाचे पीकही चांगले उगवले होते. मागच्या काही दिवसांपासून कडोळी व परिसरात रोहिंची संख्या वाढली आहे. या रोहिंना हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर धावून येत आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पंतगे, संतोष माहोरकर आदींनी पाहणी करून वनविभागाना कळविले. तर वनविभागाने शेतकऱ्याला ऑनलाइन नुकसानीची तक्रार देण्यास सांगितली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी येऊन पंचनामा करतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.