हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून १० एप्रिल रोजी दुचाकी चोरीला गेली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथील सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच हरिदास व्यंकटीराम टापरे व अरविंद हरिदास टापरे या दोघांच्या मदतीने २९ दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. या घटनेतील दोघे आरोपी फरार होते. यातील हरिदास व्यंकटीराम टापरे यास ३० एप्रिल रोजी स्थागुशा पथकाने पांगरी शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट शिक्केही हस्तगत केल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, त्यास हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय, पोउपनि. किशोर पोटे, शिवसांब घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संभाजी लेकुळे, बालाजी बोके, भगवान आडे, प्रशांत वाघमारे, विठ्ठल काळे यांच्या पथकाने केली.
दुचाकी चोरीच्या टोळीतील दुसरा आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:28 AM