- अरुण चव्हाणजवळा बाजार (जि. हिंगोली) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे एका ३२ वर्षीय युवकाने १३ मे रोजी मध्यरात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे.
काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, या नैराश्यातून नालेगाव येथील गोविंद शिवाजी राखोंडे (वय ३२) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. १४ मे रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी व नातेवाइकांनी हट्टा पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव, शेख मदार आदींनी नालेगाव येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी एक सुसाइड नोट आढळून आली असून नातेवाइकांनी ती पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. त्यानंतर जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मृत गोविंद राखोंडे याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.