- रमेश कदम आखाडा बाळापूर ( हिंगोली): आखाडा बाळापूर नजीकच्या देवजना येथील एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली . 25 वर्षे वय असलेल्या या तरुणाचे नाव कृष्णा उर्फ लहू यशवंतराव कल्याणकर असे आहे. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करणाऱ्या लहूने देवजना शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.
माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूरचे ठाणेदार गोपीनवार सुनील, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मृत लहू याच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली आहे. यात 'मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे ; असे लिहलेले आढळले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लहू हा ट्रॅक्टर चालक असून त्याचे सातवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. सध्या तो ट्रॅक्टरवर सोयाबीन काढण्याचे काम करत होता असे ग्रामस्थांनी सांगितले.