हिंगोली : जिल्ह्यात ४६६० सौरपंप बसविण्यात आले असून याबाबत काही तक्रारी असल्यास महावितरणच्या हिंगोली येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयातील सहायक अभियंत्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले.
जाधव यांनी सांगितले की, शासनाकडून या वेबसाईटवर नियंत्रण ठेवले जाते. यावर जवळपास १५ हजार ९९० जणांनी सौरपंपासाठी अर्ज केला होता. मात्र यातील ९६२६ अर्ज विविध कारणांनी रद्द झाले. तर ४९७१ जणांना कोटेशन दिले होते. यापैकी ४६६० जणांच्या शेतात पंप बसला आहे. तर ३०४ जणांचे काम होणे बाकी आहे. या पंपांबाबत महावितरणकडे महिन्यात दहा ते पंधरा तक्रारी येतात. मात्र जर अडचणी असतील तर सहायक अभियंता रेड्डी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. यात पंपासह यंत्रणेची पाच वर्षांची हमी असून तोपर्यंत कंपनी जबाबदार असते, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यातील अटीत ही तक्रार बसली पाहिजे. शिवाय एचव्हीडीएसमध्ये ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या ४८८१ जणांना वीज जोडणी देणे बाकी होते. यापैकी ४१२७ जणांना जोडणी दिली. आता ७५४ जोडण्या शिल्लक आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत या जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय त्यानंतरचे आता २४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध नाही. वसुलीचे प्रमाण कमी असल्याने या नवीन कामांना मंजुरीत अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतर सेवा देण्यासाठीही त्या रोहित्रावर किमान ८० टक्के वसुलीचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे वसुली न भरल्यास अडचणी येत आहेत, असेही जाधव यांनी सांगितले.