सेनगाव (हिंगोली ) : एका अल्पवयीन मुलीस दोघांनी एका बंद असलेल्या घराजवळील स्वच्छतागृहातच ढकलून देत डांबून ठेवले. ‘तू जोपर्यंत प्रेमाची कबुली देत नाहीस तोपर्यंत तुला सोडणार नाही’ असे मुलीस धमकावत तिला व तिच्या भावाला ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. याप्रकरणी २२ जून रोजी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघां आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही २१ जून रोजी शाळा सोडण्याचा दाखला आणण्यासाठी शाळेत पायी जात होती. तेव्हा आरोपी अजय पंडित शिंदे याने तिला रस्त्यात अडविले. प्रतिकार करत अजय यास ढकलून देत ती पुढे गेली. परंतु तितक्यात अजयसोबतच्या विशाल कुंडलिक माने याने तिला सीताराम कांबळे यांच्या बंद असलेल्या घरासमोरील स्वच्छतागृहात ढकलून देत डांबले. यावेळी अजयने तिला धमकावले. ‘जोपर्यंत तू प्रेमाची कबूली देत नाहीस, तोपर्यंत तुला सोडणार नाही. शिवाय आरडा-ओरड केल्यास तुला व तुझ्या भावाला ठार मारून टाकेन’ अशी धमकी दिली.
यावेळी पीडित मुलीने आरडा-ओरड करत तिच्या मामाला आवाज दिला. त्यानंतर मुलीच्या मामाने धाव घेत दोन्ही आरोपींच्या तावडीतून तिची सुटका केली. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी अजय पंडित शिंदे (वय १५), विशाल कुंडलिक माने (वय १८) (दोघे रा. दाताडा बु. ता. सेनगाव) विरूद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात कलम ३४१, ३४२, ५०६, ३४ भादंविसह कलम ३ (२) (५) (ए) अनुसुचित जाती, जनजाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी हिंगोली ग्रामीणचे उप विभागीय पोलीस अधिकारी ए. जी. खान व सेनगाव ठाण्याचे पोनि सरदारसिंग ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली.