शेवाळ्यात शिवसेनेला केवळ दोन जागा
आखाडा बाळापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतींमध्ये बाळापूर ग्रामपंचायतीच्या आखाड्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील यांनी आपली ‘मांड’ मजबूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. १३ जागा जिंकत एकहाती विजय मिळवित शिवसेनेच्या पॅनलला धूळ चारली. शेवाळा ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा अभय सावंत यांनी आपला गड कायम राखत शिवसेनेचे माजी सभापती अजय सावंत यांच्या पॅनलला पराभूत केले. दाती ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांना पराभवाचा झटका बसला, तरीही त्यांच्या पॅनलने बहुमत प्राप्त केले आहे.
आखाडा बाळापूर, शेवाळा, दाती या गावांमधील ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या अटीतटीच्या झाल्या. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा पातळीवरील नेते ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सक्रिय सहभागी असल्याने या निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवर संजय देविदास बोंढारे यांच्या गटाचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या वतीने मोठे आव्हान उभे केले होते. शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दत्ता बोंढारे यांच्यात थेट लढत होती. या चुरशीच्या लढतीत दत्ता बोंढारे विजयी झाले, तर काँग्रेसच्या साई ग्राम विकास पॅनलने तब्बल १३ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. बाळापूरच्या आखाड्यात आपलीच चलती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ.संतोष बांगर यांची प्रचार सभा बाळापूर येथे पार पडली. मात्र, मंत्र्यांची प्रचार सभाही फेल गेली आणि बोंढारे यांनी ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात ठेवली आहे.
शेवाळा ग्रामपंचायतीमध्ये दोन युवानेत्यांमध्ये लढत रंगली होती. शिवसेनेचे माजी उपसभापती अजय सावंत यांचे पॅनल व कांग्रेसचे माजी सरपंच अभय सावंत यांच्या पॅनलमध्ये चुरशीचा सामना होता. १३ जागांसाठी येथे मतदान प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये माजी सरपंच अभय पाटील सावंत यांच्या गटाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत ११ जागांवर विजय मिळविला, तर शिवसेनेच्या पॅनलला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले.
दाती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या पॅनलला शिवसेनेच्या पॅनलने जोरदार टक्कर दिली. ९ जागांसाठी या गावात मतदान प्रक्रिया पार पडली होती. दोन वॉर्डातील सहाही जागा निवडून आणत त्यांनी बहुमत मिळविले असले, तरी त्यांना स्वतःला मात्र पराभूत व्हावे लागले. काँग्रेस तालुकाध्यक्षाच्याच पदरी पराभव आला असल्याची चर्चा जोरात रंगली असली, तरी बहुमत आणि ग्रामपंचायतीची सत्ता यांच्याकडे राहणार आहे. त्यांच्या सौभाग्यवती विजयी झाल्या आहेत.
जरोडा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांदू भिसे, उत्तमराव बहात्तरे यांच्या पॅनलला पराभूत व्हावे लागले. तेथे देवराव भिसे यांच्या पॅनलने ७ पैकी ७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. रुद्रवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी उपसरपंच रुहुल्ला पठाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सातपैकी सहा जागा जिंकत वर्चस्व प्राप्त केले आहे. सत्ता कायम राखली आहे. माजी खा.शिवाजी माने यांचे गाव असलेले कान्हेगाव येथे यावेळेस परिवर्तन घडले आहे. माने यांचे पुतणे दत्ता माने यांच्या पॅनलला दोनच जागा मिळविता आल्या, तर राष्ट्रवादीचे युवानेते श्रीकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ५ जागा मिळवत सत्तांतर घडविले आहे.
चौकट
सून विजयी... सासू पराभूत
दोन खासदार देणारे हिंगोली जिल्ह्यातील कान्हेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक सासू विरुद्ध सुनेच्या लढतीने मराठवाड्यात गाजली होती. या अटीतटीच्या लढतीत सासूला पराभूत करीत सूनबाईने विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या वॉर्डातून पतीही ही विजयी झाला आहे. त्यामुळे पती-पत्नी एकाच सभागृहात कामकाज करणार आहेत.