हिंगोली : ट्रॅक्टर चालकावर वाळु चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि ठाण्यात लावलेली मोटारसायकल सोडविण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय माधव कोरंटलू यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना १४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली.
एपीआय कोरंटलू यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात एसीबीच्या पथकाने खुलासे मागविले होेते. परंतु एसीबी विभागाला समाधानकारक खुलासे कोरंटलु यांनी सादर केले नाही. त्यामुळे त्यांना हिंगोली येथील एसीबीच्या कार्यालयात गुरूवारी अधिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. परंतु एसीबीला पाहिजे तसे खुलासे ते सादर करून शकले नाही. त्यामुळे त्यांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सदर प्रकरणात यापुर्वी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ठाण्याचा एक पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व एका खाजगी इसमाविरूद्ध लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणात एपीआय कोरंटलू यांचाही हात होता, मात्र त्यावेळी स्पष्ट झाले नव्हते. एसीबीने सखोल चौकशी करून अखेर त्यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.