हिंगोली: हळद आरोग्यदायी तर मानली जाते. त्यामुळे हळदीला मोठे महत्व असून, मागील काही वर्षात शेतकऱ्यांसाठीही हळदीचे पीक परवडणारे ठरत आहे. यंदा हळदीचे उत्पादन समाधानकारक झाले असून, ३ एप्रिल रोजी येथील मोंढ्यात तब्बल ११ हजार कट्ट्यांची आवक झाली. ५ हजार ५०० ते ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
जिल्ह्यात यंदा ३४ हजार २३० हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ हजार हेक्टरने लागवड घटली तरी उत्पादन समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील पंधरवड्यापासून येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये नवी हळद विक्रीसाठी येत आहे. आत्तापर्यंत सरासरी दोन हजार क्विंटलची आवक होत होती. परंतु, मार्चएंन्डमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे मार्केट यार्ड तीन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर ३ एप्रिल रोजी मार्केट यार्ड सुरू झाले.
या दिवशी तब्बल ११ हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली. सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच हळद टाकण्यासाठी शेडमध्ये जागाही अपुरी पडली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची हळद सायंकाळपर्यंत वाहनातच होती. वाहनातील हळदीचा एक कट्टा काढून त्याचा लिलाव करण्यात आला. त्यानुसार संबंधीत शेतकऱ्याच्या हळदीला भाव दिल्या गेला. आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजमापाचे काम ४ एप्रिल रोजीही दिवसभर चालेल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.