- संतोष चाकोते साखरा (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील साखरा येथे वीज पडून साळूबाई कायंदे या महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे साखरा गावावर शोककळा पसरली आहे.
साखरा व परिसरात अधून-मधून पाऊस चालू असून सोमवारी विजेचा कडकडाट अधिक प्रमाणात होता. दरम्यान परिसरात जोरदार पाऊस झाला. काही भागात मेघगर्जना होत होती. १९ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान शेतीकाम करीत असलेल्या पती-पत्नीवर वीज पडली. यामध्ये साळूबाई रंगनाथ कायंदे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रंगनाथ वामन कायंदे (वय ६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जवळच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने हिंगोलीच्या दवाखान्यात दाखल केले.
दोघेही दुपारच्यावेळी शेतीची कामे करत होते. यावेळी जोराचा पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी ते पुढे चालत असतानाच वाटेतच दोघांच्या अंगावर वीज पडली. प्रारंभी गंभीर जखमी असलेले रंगनाथ कायंदे व साळूबाई कायंदे यांना साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी साळूबाई कायंदे यांना मृत घोषित केले. सदर घटनेचा पंचनामा तलाठी जी. एफ. पठाण यांनी केला.
राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाची झडप...चोहीकडे राखी पौर्णिमा सण साजरा केला जात असतानाच साखरा परिसरात शेतीकाम करणाऱ्या दाम्पत्यावर वीज पडली. या दुर्दैवी घटनेत रंगनाथ कायंदे हे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी साळूबाई कायंदे यांचा मृत्यू झाला. शासनाने या शेतकरी दाम्पत्यास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.