हिंगोली शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दोन कंपन्यांच्या दोन एजन्सी आहेत. या एजन्सीद्वारे शहरातील इमारतींमध्ये, गल्लीमध्ये सिलिंडर पोहोचविले जातात. शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, काही गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयचे कोरोना लसीकरण झाले नाही. त्यामुळे सिलिंडर घेताना ग्राहकही काळजी घेत आहेत. डिलिव्हरी बॉय लसीकरणासाठी पुढाकार घेत असले तरी लसीकरणाच्या गोंधळामुळे त्यांना लसीकरण करता आले नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सर्व डिलिव्हरी बॉयना सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले आहे. ते शासनाच्या नियमांचे पालन करीत असून संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत आहेत. जवळपास सर्व डिलिव्हरी बॉयनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्याचे गॅस एजन्सीचे व्यवस्थापक निखिल बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सिलिंडर डिलिव्हरी बॉयही जीवाची बाजी पणाला लावून सलग सेवा देत आहेत. मात्र, त्यांचे म्हणावे तेवढे कौतुक होत नसल्याची खंतही बोरकर यांनी व्यक्त केली.
शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक - ५७ हजार
गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सी - ०२
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - १९
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - १२
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - २
एकही डोस न घेणारे कर्मचारी - ७
१ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह...
मोठ्या शहरात कोरोनामुळे अनेक डिलिव्हरी बॉयना कोरोनाची लागण झाली. हिंगोली शहरात मात्र मोजकेच डिलिव्हरी बॉय आहेत. यापैकी एका डिलिव्हरी बॉयला कोरोना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉय सुद्धा आरोग्याची काळजी घेत आहेत.
डिलिव्हरी बॉय म्हणतात...
सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १८ वयोगटावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली. या काळात लसीकरणात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात एक ते दोन दिवस ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, झाले नाही. परंतु, आता लवकरच लस घेईन.
- शिवाजी इंगळे
ग्राहकांच्या व स्वत:च्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. दुसऱ्या डोसची मुदत आल्यानंतर दुसरा डोसही घेणार आहे. सिलिंडर पोहोचते करताना हॅंडग्लोज वापरत असून मास्कचा वापर करीत आहे.
- आनंदा जाधव
जबाबदारी कोणाची?
घरगुती गॅस घरोघरी पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या लसीकरणाची जबाबदारी एजन्सीने घेणे गरजेचे आहे. आपणही कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
सिलिंडरचे वजन जास्त असल्याने त्याला उचलताना ग्राहकांचा व डिलिव्हरी बॉयचा स्पर्श होतो. त्यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग असल्यास त्याचा प्रसार होऊ शकतो. कोरोनापासून बचावासाठी सिलिंडर घरात घेतल्यानंतर त्याला सॅनिटाईज करणे गरजेचे असते. त्यामुळे सिलिंडरवर सॅनिटायझर मारला जावा. परंतु, सॅनिटायझर मारत असताना, घरात गॅस अथवा दिवा सुरू नसावा, याची काळजी घ्यायला हवी.