गुगलला विचारा, सर्वात खोटारडा कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:53 AM2018-04-10T00:53:06+5:302018-04-10T10:50:35+5:30
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अॅड. बाबा नाईक, दिलीप देसाई, डॉ.सतीश पाचपुते, भगवान खंदारे, विनायक देशमुख, केशव नाईक, श्यामराव जगताप, ज्ञानेश्वर जाधव, भागोराव राठोड, शिवाजी मस्के, सीमा हाफिज, शोभा मोगले, सुमेध मुळे, विलास गोरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी ११ वाजता म.गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ झाला. इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर खा.सातव व कार्यकर्त्यांनी हातगाड्यावर मोटारसायकल ढकलत नेत अशी वेळ सर्वसामान्यांवर आल्याचे सांगितले. हातगाडा ओढण्याची ही पदयात्रा गांधी चौक ते गणपती चौक व पुन्हा गांधी चौक अशी काढण्यात आली. यावेळी दिवसभर या मंडपात आ.टारफे व कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केले. या ठिकाणी खा.सातव यांच्या भाषणाने सायंकाळी या आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी सातव म्हणाले, जगात सर्वांत खोटा व्यक्ती कोण? असा प्रश्न गुगलला विचारला तर तेही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दाखवू लागले आहे.
अतिशय खोटे बोलून सत्तेत आलेल्या या माणसाने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतीमालास भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, संख्येने सर्वाधिक असलेले लहान व्यापारी हैराण आहेत. तर सर्वांत मोठ्या अदानी, अंबानी, माल्या, मोदीसारख्या मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहरबान होत आहे. या शासनाच्या काळात भ्रष्टाचार करून लोक पार्सलही नेत आहेत. महिलांचे प्रश्नही सुटले नाहीत. चीन, पाकिस्तान पुन्हा डोके वर काढत आहे. माध्यमांसह न्यायालयांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. मंत्रालयात तर जाळ्या लावताहेत. कारण तेथे जोकर वाढल्याचा टोलाही लगावला. शेतकºयांना बायका लेकरांसह रांगेत लावणाºयांना जनता जागा दाखवणार आहे. भाजप-सेनेच्या सरकारमधले लोकच लाभार्थी झाले. भाजप हे अत्याचार करीत असताना सेनेचे लोक राजीनाम्याचे नाटक करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.