हिंगोली: कळमनुरी पंचायत समितीतील सहायक लेखाधिका-याने शौचालय बांधकामाची ३.८४ लाखांची देयके अडवून धरीत ७ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी पं.स. कार्यालयातच रंगेहाथ पकडले आहे.
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शौचालय बांधकाम करण्यात आले आहे. त्याची ३.८४ लाखांची देयके प्रलंबित असून ती काढण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. याबाबत लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधितांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.
यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहायक लेखाधिकारी बी.एस. शिंदे हे अलगद जाळ्यात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.