मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक कान्होजी रामचंद्र मुकाडे हे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी कळमनुरी शहराजवळ आली असताना अचानक निलगायीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुकाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात हलवले होते.
हिंगोलीत उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तब्येत चांगल्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटीही दिली जाणार होती. मात्र ७ जुलै रोजी रात्री अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मूळचे रहिवासी असलेले कान्होजी मुकाडे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा या पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्हा पोलीस दलात दाखल झाले. जिल्ह्यात त्यांनी हिंगोली, कळमनुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या ते सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फोटो :