हिंगोली : औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात जिल्हा रात्रगस्त तपासणीसाठी दारू पिऊन गेलेले सहायक पोलिस निरीक्षक एस.एस. गिरी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
हिंगोली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक एस.एस.गिरी हे रविवारी रात्री औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात जिल्हा रात्रगस्त तपासणीसाठी गेले होते. या वेळी त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते. ते बोबड्या भाषेत बोलत होते. त्यांच्या तोंडाचा उग्रट वास येत होता. त्यामुळे याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून गिरी यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. याप्रकरणी सोमवारी पोलिस हवालदार दिलीप नाईक यांच्या फिर्यादीवरून गिरी यांच्यावर औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना औंढा पोलिसांना दिल्या होत्या. त्या अहवालानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे.