हिंगोली : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाफेड हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू व्हावी यासाठी मागील महिन्याभरापासून मोठी ओरड सुरू आहे. आता नाफेड हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी शुभारंभाला अखेर मुहूर्त सापडला असून, १४ मार्चपासून जिल्ह्यातील विविध सात केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून ५ केंद्रांवर हरभऱ्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली होती. तर दोन केंद्रांवर आठ दिवसांनंतर नोंदणी सुरू झाली. हमीभाव ५ हजार ३३५ जाहीर झाला असताना खुल्या बाजारात ४ हजार ५०० च्या वर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेड हमीभाव केंद्रांकडे धाव घेतली.परंतु, जवळपास पंधरा दिवस केवळ नोंदणी प्रक्रियाच सुरू होती. तर खरेदीला मात्र सुरुवात होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत होता.
हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे यासाठी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली होती. परंतु, त्याउपरही नाफेड केंद्र सुरू होण्याला मुहूर्त सापडत नव्हता. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे एक ते दीड हजार रुपये कमी दराने हरभरा विक्री करावा लागला. यातून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर आता नाफेड खरेदी केंद्र शुभारंभाला मुहूर्त सापडला असून, १४ मार्चपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू होणार आहे. हिंगोली शहरातील बळसोंड, कळमनुरीत कृषी उत्पन्न बाजार समितीत, जवळा बाजार, वसमत येथे मार्केट कमिटीमध्ये, सेनगाव, कनेरगाव नाका तसेच सेनगाव तालुक्यातील साखरा येथे खरेदी केंद्र सुरू होणार आहे.
११ जूनपर्यंत सुरू राहणार खरेदी केंद्र...केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने १४ मार्च ते ११ जून २०२३ दरम्यान हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार आहे. या ठिकाणी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.तर १३ मार्चपर्यंत ७ हजार ५१९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.