डोंगरकडा (जि. हिंगोली) : रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून बांधलेल्या विद्युत तारांना दोन बैल चिकटले. त्या बैलांना काढण्यासाठी शेतकरी सुभाष ग्यानोजी खंदारे (वय ३०) गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सुकळीवीर येथे रविवारी घडली.
पावसाने चांगली साथ दिली असल्यामुळे खरीप पिके जोमात आली आहेत. परंतु रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या आसपास तारा लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. २८ जुलै रोजी सुकळीवीर येथील आखाड्यावरील दोन बैल विद्युत प्रवाह असलेल्या तारांजवळ गेले व चारा खात असताना चिकटले गेले. हा प्रकार शेतकरी सुभाष खंदारे यांच्या लक्षात येताच त्यांनी बैलांना तारांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत दोन बैलांसह शेतकऱ्याचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच डोंगरकडा चौकीचे जमादार नागोराव बाभळे व गणेश गायकवाड यांनी सुकळीवीर येथे जाऊन पंचनामा केला. मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन, प्रशांत स्वामी, साहेबराव चौरे यांनी शवविच्छेदन केले. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. तपास जमादार नागोराव बाभळे हे करीत आहेत. या घटनेमुळे डोंगरकडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.