हिंगोली: मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक वळणावर आले असताना हिंगोलीतही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हिंगोली येथील भाजपचे जिल्हा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काही अज्ञात मराठा आंदोलकांनी केला.
हिंगोली येथील भाजप जिल्हा कार्यालय मागील दोन दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आले होते. तसेच दुपारनंतर या कार्यालयाला पोलीस बंदोबस्तही दिला होता. मात्र रात्री सव्वा दहाच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी पेट्रोलची बॉटल सोबत आणून शटरवर ओतली. या ठिकाणी असलेल्या होमगार्डचा मोबाईल हिसकावला, तर आग लावून घोषणा देत निघून गेले. यानंतर होमगार्ड व इतर पोलिसांनी धावाधाव करीत आग विझवली.
शटर उघडल्यानंतर आतमध्ये कार्यालयाच्या काचा तडकल्याचे निदर्शनास आले. इतर काही नुकसान झाले नाही. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट देऊन पाहणी केली. एका शटरचे कुलूपही तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते कुलूप उघडत नव्हते. दुसरे शटर उघडल्यानंतर आतमध्ये धूरच धूर पसरल्याचे दिसून आले.