आखाडा बाळापूर (हिंगोली ) : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीतच फरशीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२० ) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी आरोपीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बाईक चोरीच्या गुन्ह्यात आरोपी देविदास बाबुराव कांबळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथून अटक केले होते. त्याच्याकडून तब्बल 26 मोटारसायकल जप्त करून बाळापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. बाळापुर पोलिसांनी कांबळेला रविवारी (दि.१८ ) सेनगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 20 तारखेपर्यंत ची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयातून परत येत असताना त्याने कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी येथे पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस वाहनातून पळून गेला होता.
यानंतर १२ तासाच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी (दि.१९ ) मोरवाडीच्या जंगलात एका झाडावरून त्याला पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर त्याला बाळापूरच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्याने पोलिस कोठडीतील फरशीचा तुकड्याने स्वतःचा गळा चिरून घेत अंगावर पांघरून घेतले. काही वेळाने कोठडीत मोठा रक्तप्रवाह पसरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कांबळेला तत्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे.