गतवर्षी दिला भत्ता
या योजनेसाठी गतवर्षी भत्ता देण्यात आला होता. यंदा या प्रवर्गातील जवळपास ५४०० विद्यार्थिनींना हा भत्ता मिळणे शक्य होते. मात्र, कोरोनाच्या काळात शाळा बंदच असल्याच्या कारणाने हा भत्ता देण्यात येणार नसल्याचे पत्र शासनाने काढल्यामुळे यापुढे या मुलींना या भत्त्यापासून वंचित राहावे लागणार असे दिसत आहे.
भत्ता बंद झाल्याने काय परिणाम झाला
अनेक मुलींना त्यांचे पालक हा भत्ता मिळत असल्याने त्यांचा खर्च त्यावर होतो, म्हणून शाळेत पाठवत होते. मात्र, आता शासनाने प्रतिदिन एक रुपया बंद केल्याने अनेक मुलींचे पालक त्यांना शाळेत पाठविण्यास उदासीनता दाखवू शकतात. त्यामुळे मुलींच्या उपस्थितीचे प्रमाणही घटण्याची शक्यता आहे.
दिवसाला रुपया, तोही केला बंद
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जातीच्या विद्यार्थिनींना प्रतिदिन प्रत्येक मुलीमागे एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येत होता. त्यातही जर मुली गैरहजर राहिल्या तर तेवढ्या रकमेची कपात होत होती. वार्षिक २२० रुपये म्हणजे ही अगदीच जुजबी रक्कम होती. मात्र, शासनाने तोही बंद केला आहे. याचा परिणाम मुलींच्या उपस्थितीवर होणार आहे. ही बाब लक्षात घेता, तो पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
मुलींची शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी शासनाने हा चांगला उपक्रम सुरू केला होता. मात्र, शाळा बंद असल्याने हा भत्ता बंद केला. मात्र ऑनलाइन वर्गासाठी नेट रिचार्जसाठी उलट खर्च वाढला आहे. त्यामुळे हा भत्ता बंद करणे अन्यायकारक आहे.
-ॲड. पंजाब चव्हाण, गोर सेना पदाधिकारी