औंढा नागनाथ : मोंढ्यामध्ये खरेदी केलेला गहू ट्रकमधून विक्रीसाठी नेत असताना पोलीस प्रशासनाने चौकशी न करताच पकडला. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी संतापले असून या घटनेला विरोध म्हणून मोंढ्यात शेतक-यांकडून गहू खरेदी न करण्याचा निर्णय घेऊन ट्रक सुटेपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर व्यापा-यांनी मोंढा बंद ठेवला होता.
औंढा नागनाथ येथे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजारपेठ आहे. या ठिकाणी मोजकेच व्यापारी शेतक-यांचा शेतामध्ये काढलेला माल विकत घेतात व व्यापारी तो माल इतर ठिकाणी विक्रीसाठी नेतात. ४ फेब्रुवारी रोजी बालाजी ट्रेडिंग कंपनीच्या वतीने शेतक-यांकडून खरेदी केलेला गहू हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी ट्रक क्र. एमएच २६ एस ८६६३ मधून १८९ पोते घेवून जात असताना औंढा नागनाथ पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांनी अडविला. याबाबत व्यापारी रामनिवास राठी यांनी विचारले असता पोलिसांनी मिळालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार या ट्रकमध्ये शासकीय धान्य काळ्या बाजारात जात असल्याची असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळे हा ट्रक पकडण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृत गुन्हा दाखल न करता महसूलच्या अधिका-यांना त्या ठिकाणी पाचारण करून ट्रकमधील उपलब्ध धान्याचे नमुने घेण्यात आले. सदरील नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. व्यापा-यांना त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाई केल्याची भावना व्यापा-यांमध्ये निर्माण झाल्याने औंढा येथील व्यापारी संघटनेच्या वतीने यानंतर मोंढ्यामध्ये येणारे शेतक-यांचे धान्य खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरणाची योग्य चौकशी होत नाही, तोपर्यंत मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
औंढा तालुका कृषी खरेदी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम राठी यांना विचारले असता ते म्हणाले, सदरील घटना ही जाणीवपूर्वक केली आहे. व्यापाºयांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम सुरू आहे, केवळ व्यापा-यांना त्रास देण्याचा उद्देशानेच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी असे मत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात लावलेला ट्रक सोडून देण्याच्या मागणीसाठी जवळाबाजार, शिरडशहापूर, औंढा नागनाथ येथील व्यापाºयांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह तहसीलदारांना बुधवारी निवेदन देण्यात येणार आहे.