औंढा नागनाथ : येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ येथील महाशिवरात्रा यात्रा महोत्सव कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत. मात्र, या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघडे असणार असल्याचे संस्थानच्यावतीने कळविण्यात आले आहे.
यात्रा महोत्सव रद्द होण्याचे सलग हे तिसरे वर्ष असल्याने व्यवसायिक यांचे कंबरडे मोडले आहे. औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येते. दर्शनासाठी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमधून यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यंदा २६ फेब्रुवारी ते ५ मार्च पर्यंतच्या काळात यात्रा आयोजनाबाबत नागनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले होते. दरम्यान, कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यात्रा महोत्सव रद्द करण्याचे आदेश दिले.
महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी संस्थानच्यावतीने आयोजित पूजापाठ सुरू राहणार आहेत. या काळात परिसरात कोणतेही दुकाने लावता येणार नाहीत. दरम्यान, या काळामध्ये मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी उघडे राहणार असल्याचे अध्यक्ष कानगुले यांनी सांगितले.