औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभाग कक्षास रविवारी आग लागून चार ते पाच वर्षांची रोख पुस्तिका, संगणक व इतर महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाल्याची घटना घडली. त्याबाबत संशय व्यक्त केला जात असून खरोखरच आग लागली की लावली गेली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच औंढा पोलिसांनी मंगळवारी पंचायत समिती कार्यालयातील लेखा कक्षाची पाहणी करून सील लावल्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभाग कक्षातून धुराचे लोट येत असल्याचे सेवकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने तत्काळ कुलूप उघडून लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापूर्वीच कक्षात असणारी २०१८ ते २०२३ पर्यंतची रोख पुस्तिका, अभिलेखे, संगणक व इतर महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले होते. याबाबत सोमवारी औंढा पोलिसांना लिखित तक्रार दिल्यानंतर स्थळ पंचनामा करून कक्षाला कुलूप लावण्यात आले. परंतु मंगळवारी पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्यासह पोलिस पथकाने पुन्हा पाहणी करून कक्ष सीलबंद केले. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सदर अभिलेखे नव्हते संगणकीकृतकक्षास आग लागण्याच्या दोन दिवसांपूर्वी २९ नोव्हेंबर रोजी २०१८ ते २०२२ दरम्यान लेखाविभागात शासनाचे विविध कर बुडवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विभागीय कार्यालयामार्फत चौकशी सुरू करण्यात आली होती. शनिवार व रविवार सुटी असल्यामुळे सोमवारपासून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार होती. नेमके त्याचदरम्यान अभिलेखे जळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच सदर अभिलेखे संगणकीकृत नसल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे या जळीतप्रकरणी संशय व्यक्त केला जात असून याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे यांनी दिली.