औंढा नागनाथ : अतिवृष्टीमुळे साेयाबीनसह तुरीचे नुकसान झाले हाेते. यातून कसेतरी वाचलेले तुरीचे पीक उधळमीमुळे हातचे गेले आहे. तालुक्यात जवळपास एक हजार हेक्टरवर तुरीचे पिकाचे नुकसान केले आहे. या नुकसानीची विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नाेंदविण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात ५० हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली आहे. तसेच आंतरपीक म्हणून तुरीच्या पिकाची लागवड केली. तालुक्यात एकूण साडेचार हजार हेक्टरवर तुरीच्या पिकाची लागवड केली हाेती. येहळेगाव सोळंके, सुरेगाव, पिंपळदरी, शिरडशहापूर, माथा शेतशिवारात तुरीचे माेठे पेरणी क्षेत्र आहे. अतिवृष्टीमुळे साेयाबीनचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने तूर पूर्णतः जळून गेली आहे. शेंगा लागून पऱ्हाट्या झाल्या आहेत. तालुक्यात एक हजार हेक्टरच्यावर उधळीमुळे तुरीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाचा पेरा व विमा घेतला आहे. अशा शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार नोंदवून कृषी विभागाकडे अर्ज सादर करण्याचे मंडल कृषी अधिकारी संजय कंचले यांनी सांगितले आहे.