हिंगोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले असून दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत आहे. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात १३.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मान्सून कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी ३९.८२ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली होती. मात्र पुन्हा या दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी रात्री चांगलाच पाऊस बरसला. रविवारपर्यंत मागच्या २४ तासात जिल्ह्यात १३.५० मिमी पावसाची नोंद झाली असून, यात हिंगोली तालुक्यात १३.६०, कळमनुरी १९.७०, वसमत १२.२०, औंढा नागनाथ १३.३०, सेनगाव तालुक्यात सर्वात कमी ९.१० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे जमीन अजूनही तहानलेली आहे.
सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यात
जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत ३१६.७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यात २९६.७० मिलिमीटर तर सेनगाव तालुक्यात २९७.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सर्वात जास्त पाऊस औंढा तालुक्यात २५३.५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर कळमनुरी ३४१.१० मिलिमीटर, तर हिंगोली तालुक्यात ३१२.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत झालेला पाऊस (मान्सून कालावधी)
तालुका सर्वसाधारण पाऊस एकूण झालेला पाऊस टक्केवारी
हिंगोली ८६७.९० ३१२.१० ३५.९६
कळमनुरी ७९५.४० ३४१.१० ४२.८८
वसमत ८२४.०० २९६.७० ३६.०१
औंढा ७३६.१० ३५३.५० ४८.०२
सेनगाव ७२९.७० २९७.५० ४०.७७
एकूण ७९५.३० ३१६.७० ३९.८२