४२२ ग्रामपंचायतींच्या १२६७ प्रभागांत ७८६१ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतच लढती झाल्या. मंत्री, आमदारांनी मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचार केल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले. एका ठिकाणी चिन्हाबाबत उमेदवारांमध्येच असलेला संभ्रम वादाचे कारण ठरला होता. तर काही ठिकाणी मतदान यंत्रांवरील चिन्हे फिकट दिसत असल्याने मतदानात अडथळे आले. मात्र, नंतर तेथील बॅलेट पेपर बदलून देण्यात आले.
हिंगोली @ ८२.५%
हिंगोली तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यात २४१ मतदान केंद्रांवरून ४३ हजार ५६४ पुरुष, तर ३८ हजार ६७३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून हे प्रमाण ८२.२५ टक्के एवढे आहे. २३७ प्रभागांत ही निवडणूक झाली. ५८६ जागा निवडून द्यायच्या असून १८९ यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
सेनगाव @ ८०.५%
सेनगाव तालुक्यात मतदान शांततेत झाले असून ८०.५ टक्के मतदानाचा अंदाज आहे. यात १५८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान, सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील ९७ पैकी १६ ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झाल्यामुळे ८१ ग्रामपंचायतींमध्ये २४७ बूथवर निवडणूक प्रक्रिया होती. बन, सवना येथे किरकोळ गोंधळ झाला.
वसमत @ ८५%
वसमत तालुक्यात १०६ पैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ९८ ग्रा.पं.साठी ८५ टक्के मतदान झाले. एकूण १ लाख मतदारांना मतदानाचा हक्क होता. काही ठिकाणी किरकोळ वाद, चिन्ह फिकट दिसत असल्याने झालेला गोंधळ वगळता मतदान शांततेत पार पडले.
औंढा @ ८१.४१%
औंढा तालुक्यातही ८१.४१ टक्के मतदान झाले. येथे ८८ पैकी १७ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या होत्या. ७१ ग्रा.पं.तील ५०८ जागांसाठी ११३४ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ८१ पाझर तांडा येथे किरकोळ वाद झाला. इतरत्र शांततेत मतदान झाले. ३५, २२४ स्त्री तर ३९,३५० पुरुष मतदारांनी मतदान केले.
कळमनुरी तालुक्यात ९० ग्रा.पं.साठी ८०.१४ टक्के मतदान
कळमनुरी : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी ८०.१४ टक्के मतदान झालेले आहेत. ६१५ जागांसाठी १३६० जण रिंगणात आहेत. २७५ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी ९.३० वाजता ५.२ टक्के, ११.३० वाजता १९.२० टक्के, दुपारी १.३० वाजता ३८.११ टक्के, दुपारी ३.३० वाजता ६८.३६ टक्के मतदान झाले होते. ५०,४८३ पुरुष तर ४४,७६७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ८०.१४ टक्के आहे.