लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहेलवानकी करताना असो वा वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण आवश्यकच आहे. रागामुळे पहेलवानकीत केवळ डावच चुकेल. वैयक्तिक आयुष्यात रागामुळे मोठी हानीही होवू शकते. त्यामुळे शांतचित्त ठेवणे हेच सर्वात चांगले असते, असे मत हनुमान व्यायामशाळेचे पहेलवान पांडुरंग लुंगे यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, पहेलवान आहे म्हणजे अंगात रग आलीच. मात्र त्यासोबत राग असेल तर यश मिळणेच शक्य नाही. रागाच्या भरात इतरच वाद, तंटे घडून नुकसान होवू शकते. यापेक्षा जास्त संयम, रागावर नियंत्रण कुस्तीच्या आखाड्यात ठेवावे लागते. आपण रागाच्या भरात असल्यास आपली एक चूक पकडून समोरचा असा डाव टाकतो की, चित करतो. मीही एकदा अलिबाग येथे महाराष्ट्र केसरीसाठी खेळत होतो. पहिले चार राऊंड जिंकले होते. पाचव्या राऊंडला एका चांगल्या पहेलवानाशी गाठ पडली. तो मला काहीच हालचाल करू देत नव्हता आणि रागात आणत होता. पहिल्या सत्रापर्यंत त्याने माझ्याकडून १७ पॉर्इंट घेतले. हाफ टाईममध्ये मला चूक लक्षात आली. त्याने जसा मला राग आणला तसाच मीही डोके शांत ठेवून त्याला राग येईल, असे पाहिले. तो रागात आला अन् चुकला. त्यामुळे मी त्याला एकाच डावात चित करून हरणारी कुस्ती जिंकलो. त्यामुळे माणसाने राग ठेवला की, हार आलीच. ती कोणत्याही स्वरुपाची असो. माणसे तुटतात, आर्थिक नुकसानही होते. प्रेमाने हे सगळे मिळविणे मात्र सोपे आहे.आजची पिढी रागात लवकर येते. चिडचिड करते. ते चांगले नाही. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. अहंकार आणि रागावर मात करायला शिकले पाहिजे. लोकमतने गुड बोला, गोड बोला या उपक्रमातून ही शिकवण देण्याचे काम सुरू केले. या कामाला माझ्याकडून शुभेच्छा...
हानी टाळण्यासाठी रागावर नियंत्रण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:49 PM