हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज नरखेड ते काचीगुडा व काचीगुडा ते नरखेड ही इंटरसिटी रेल्वे धावत असते. इंटरसिटी रेल्वेगाडीला कोरोनाआधी दोनशे ते चारशे प्रवासी असायचे; परंतु सध्या कोरोना महामारीमुळे तीस ते चाळीस प्रवासीच दिसत आहेत. इंटरसिटी वगळता हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती ही रेल्वेगाडी रविवार आणि बुधवार, अमरावती ते तिरुपती ही रेल्वेगाडी सोमवार आणि गुरुवार, तर सिकंदराबाद ते जयपूर ही रेल्वेगाडी मंगळवार आणि गुरुवार अशी धावते. गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोणत्याच रेल्वेला प्रवासी दिसत नाहीत. इंटरसिटी रेल्वेगाडी पूर्वी हाऊसफुल्ल चालायची; परंतु कोरोना महामारीमुळे प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. अति महत्त्वाचे काम असेल तर प्रवासी प्रवास करत आहेत. काही प्रवासी तिकिटाचे आरक्षण करीत आहेत; परंतु कोरोनामुळे दररोज दहा ते बारा तिकिटे रद्द केली जात आहेत. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावरही चांगलाच परिणाम होतो आहे.
‘इंटरसिटी’ची गर्दी ओसरली
इंटरसिटी (नरखेड ते काचीगुडा, काचीगुडा ते नरखेड) या रेल्वेगाडीला कोरोनाआधी मोठ्या प्रमाणात गर्दी असायची; परंतु कोरोनामुळे इंटरसिटी खालीच जात आहे.
कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे काही दिवसांपूर्वी सुरू होती; परंतु कोरोनामुळे या रेल्वेला प्रवासीही मिळेना झाले आहेत. त्यामुळे ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगोली स्थानकावर आठवड्यातून एकदा येणाऱ्या दोन रेल्वे आहेत. त्या रेल्वेंचीही गर्दी कोरोनामुळे ओसरली आहे. पूर्वी मोठी प्रवासी संख्या असायची.
विशेष रेल्वेलाही गर्दी नाही
हिंगोली स्थानकावरून तिरुपती ते अमरावती व सिकंदराबाद ते जयपूर या दोन रेल्वेगाड्या आठवड्यातून एक वेळ येतात. या विशेष रेल्वे सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली होती; परंतु आज परिस्थिती उलटी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून या दोन्ही रेल्वेला प्रवासीच नाहीत. काहीजण या रेल्वेचे आरक्षण करतात; परंतु कोरोनामुळे अनेकांनी आरक्षण तिकिटे रद्द केली आहेत. सर्वच ठिकाणचे कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अनेकांनी प्रवास करण्याचे टाळले आहे.
जानेवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अति महत्त्वाचे काम असेल तरच लोक आरक्षण करून रेल्वेने जात आहेत. रेल्वेचा प्रवास सुखकर असला तरी कोरोना महामारीमुळे प्रवास करण्याचे अनेकजण टाळत आहेत. प्रवास करतेवेळेस प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
-रामसिंग, स्टेशनमास्टर, हिंगोली रेल्वे स्थानक.