हिंगोली शहरात पूर्वी दोन ते तीन दिवसांआड हमखास पाणी यायचे. आता काही भागात सहा दिवसांपासूनही पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच ज्या भागात पाणीपुरवठा होत आहे, त्यांना गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. एक तर पाणी येत नसल्याने विविध भागांतील नागरिकांना ऐन वेळी इतरत्र पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आता पाणी आले, तर ते शुद्धीकरणानंतर येत आहे की धरणातून थेट नळाला येत आहे, हे कळायला मार्ग नाही. शहरातील विविध भागांत नळाचे पाणीच मोठ्या विश्वासाने पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता, हे पाणी आरोग्यासाठी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरे म्हणजे शहरात मागील काही दिवसांपासून बिघडलेले वेळापत्रक पुन्हा पूर्ववत नाही. दोन ते तीन नव्हे, तर सहा दिवसांनीही काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. अशा भागातील नागरिकही कधी पाणी मिळणार, अशी ओरड करीत आहेत, तर न.प.ला मात्र वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने अपेक्षित उपसा करता येत नाही. त्यामुळे अर्धवट भरलेल्या टाकीतून पाणी सोडल्यास पुन्हा अडचणी येतात, तर कधी-कधी बारा ते चौदा तास वीज राहात नसल्याने पाणीच येत नाही.
पाणी सुरक्षितच
शहरात होणारा पाणीपुरवठा हा शुद्धीकरणानंतरच होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तेवढेच सुरक्षित आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्य झाल्याने धरणात गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात आले. शुद्धीकरणानंतरही पाण्याचा थोडा पिवळसर रंग राहतो. मात्र, ते पिण्यास योग्य आहे. तर वीजपुरवठा सुरळीत राहात नसल्याने वेळापत्रक पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्याचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी सांगितले.