लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करिता सेनगाव तालुक्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. बुधवारी सापटगाव येथील सकल मराठा समाजाचा वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर भानखेडा, कवठा पाटी, खैरखेडा इ. तीन ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही काळ शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली होती.मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण ग्रामीण भागात पोहोचले असून ग्रामीण भागात पोहोचले आहे. तालुक्यात आंदोलन सत्र बुधवारीही कायम होते. तालुक्यातील सापटगाव येथील मराठा समाजाचा शेतकरी, शेतमजूरांनी सापटगाव ते सेनगाव असा भव्य बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात दोनशेहून अधिक बैलगाड्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा मोर्चा तहसीलवर धडकला. यावेळी मोर्चातील सहभागी नागरिकांनी दुकाने बंदचे आवाहन केल्याने काही वेळ बाजारपेठ बंद होती. दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.सेनगाव- जिंतूर रस्ताही अडविलाभानखेडा येथे सेनगाव- जिंतूर राज्य रस्त्यावर चार तास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन रोडवर टायर जाळून सरकारचा निषेध केला. राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून धरला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आंदोलकांवर दाखल बोगस गुन्हे मागे घ्यावे इ. मागण्या केल्या. यावेळी शेगाव खोडके, खैरखेडा, वाढोणा या तिन्ही गावांतील आंदोलक उपस्थित होते.रिसोड रस्त्यावर कवठा पाटी येथे तालुक्यातील कवठा, कोंडवाडा, कहाकर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तातडीने आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको करण्यात आला.यावेळी राज्य शासनाचा निषेध करीत पंचवीस तरुणांनी मुंडण केले.पानकनेरगाव : सेनगाव - रिसोड रस्त्यावर खैरखेडा पाटी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान तीन तास रास्ता रोको केला. आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला.मराठा समाजाच्या आंदोलनामुळे बुधवारी भरणाऱ्या सेनगावच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला. रास्तारोकोमुळे बाजार म्हणावा तसा भरला नाही तर दुकाने आणि ग्राहक नसल्याने बाजारपेठ ओस होती.कनेरगावात रस्त्यावर टायर जाळलेसवना : कनेरगाव नाका येथे १ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रस्त्यावर टायर जाळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दुतर्फा रस्त्यावर उभ्या असल्याचे चित्र होते. तसेच दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून सर्व व्यापाºयांनी पाठिंबा दर्शविला होता. जमलेल्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा या घोषणा दिल्याने हा परिसर दुमदुमला होता. आंदोलनाचा समारोप गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोनि माधव कोरंटल्लू व मंडळ अधिकारी मनोहर खंदारे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:25 AM