हिंगोली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी संपातहिंगोली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारी बँकांचे खाजगीकरण थांबवा, पाच दिवसांचा आठवडा करा, कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त कामे करून घेणे थांबवा यासह विविध मागण्यांसाठी संप केला जात आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच बँका बंद असल्याने मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे. अनेकांना बँक बंद असल्याची माहिती नव्हती, त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध शाखेतील खातेदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँक परिसरात खातेदारांची गर्दी असली तरी बँकेला मात्र कुलुप आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यामध्ये एसबीआय, सीन्डीकेट बँक, युनियन बँक, कॅनरा बँक यासह विविध बँकेतील व्यवहार ३१ जानेवारी रोजी बंद होते. १ फेबु्रवारीपर्यंत संप सुरू राहणार आहे. दोन दिवस बँका बंद राहणार असल्याने व्यवहार ठप्प राहतील. यामुळे मात्र खातेदारांची गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे हिंगोली शहरातील एसबीआय बँकेत एक महिला त्यांच्या मुलीची इंजिनिअयरींग परीक्षा शुल्क भरण्यासाठी आल्या होत्या, परंतु यावेळी बँक बंद दिसून आली. ३१ जानेवारी परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न सदर महिलेने उपस्थित केला. बँका बंदमुळे मात्र विविध कामांचाही खोळंबा झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.