लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ : येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे़निम्न मानार प्रकल्पाची निर्मिती १९६२ साली शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली़ या निम्न मानार धरणाची लांबी १८६० मीटर असून उंची २६़८२ मीटर आहे़ प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत़ डावा कालवा ६८ कि़मी़ तर उजवा कालवा २१ कि़मी़ अंतराचा आहे़सततचा दुष्काळ, विविध रोगांमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान, कर्जाचा डोंगर त्यामुळे शेतक-यांकडे हा गाळ घेवून जाण्यासाठी पैसे नाहीत़ त्यामुळे मानार प्रकल्प कार्यालयाच्या वतीने लोकसहभागातून गाळ काढून घेवून जाण्यासाठी प्रकल्पानजीकच्या ग्रामपंचायतींना कळविण्यात येईल, अशी माहिती शाखा अधिकारी आऱएल़ अजनाळकर यांनी दिली़ मात्र शेतकरी हा गाळ काढून घेण्यासाठी उत्साही नाहीत़ या प्रकल्पातील गाळ काढणे आवश्यक आहे़ प्रकल्पात सध्या १७ टक्के पाणीसाठा आहे़ चार तालुक्यांसाठी कामधेनू असलेल्या या प्रकल्पाची पाणीक्षमता वाढविण्यासाठी शेतकरी, प्रशासन, सामाजिक संस्था, स्थानिक पुढारी, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे़
बारूळ शिवारात २१ हेक्टर शेतजमिनीवरच टाकला गाळया प्रकल्पामुळे २३३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून या प्रकल्पाचा कंधार, नायगाव, धर्माबाद, बिलोली या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग होतो़ या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी शेतकºयांना प्रबोधन केले़ त्यामुळे १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून तसेच तीन जेसीबी, दोन पोकलॅन, १६ टिप्पर, दोन ट्रॅक्टरच्या मदतीने केवळ १७ हजार घनमीटर एवढा काढला़ त्यामुळे या प्रकल्पातील साठवण क्षमतेत ५़५ मि़मी़ ने वाढ झाली़ मात्र या प्रकल्पातील गाळ १८ शेतकºयांनी घेतल्यामुळे साठवण क्षमतेची वाढ अत्यल्प ठरली आहे़ या परिसरातील २१ हेक्टर शेत जमिनीवर गाळ टाकला आहे़
उपयुक्त साठा १३८ दलघमी१४६़९२ दलघमी जलसाठा असलेल्या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ६९२ चौरस मैल, १ हजार ८५६ चौ़कि़मी़ आहे़ एकूण या प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्र २ हजार ८६० हेक्टर असून यात ६ गावांची जमीन व गावे पुनर्वसित झाली आहेत़ या प्रकल्पाची मृतसाठा क्षमता ८़७१० दलघमी तर उपयुक्त जलसाठा १३८़२१ दलघमी आहे़ शनिवारी बारूळ येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पाहणी दौरा असून मानार प्रकल्पातील गाळासंदर्भात त्यांच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत़