- विजय पाटील हिंगोली : जिल्ह्यातील तीन मतदारसंघात तीन पक्षाचे आमदार आहेत. यंदा येथे तिरंगी लढती अटळ दिसत असून आघाडी व युतीला वंचित आघाडीचेही आव्हान राहणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कुणाचेच तिकीट कापले जाण्याची शक्यता नाही.लोकसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघामध्ये सेनेच्या हेमंत पाटील यांना मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे युतीतील इच्छुकांना या वेळी कोणत्याही परिस्थितीत संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. काहींची तर बंडखोरीचीही तयारी आहे. त्यामुळे आघाडीतील अनेक इच्छुकांनी काढता पाय घेतला आहे.मागच्या विधानसभेला आघाडी व युतीही झाली नव्हती. त्यामुळे प्रमुख सर्वच पक्ष रिंगणात होते. आता आघाडी व युती दोन्हीही होण्याची शक्यता वाढल्याने व काहींनी इतर पक्षात प्रवेश केल्याने त्यांची अडचण होणार आहे. बहुतेकांच्या हाती बंडाचा झेंडा दिसण्याची चिन्हे आहेत.हिंगोलीविधानसभा भाजपकडे आहे. येथे याच पक्षाचे तान्हाजी मुटकुळे सध्या आमदार आहेत. मात्र येथे सेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे हेही इच्छुक आहेत. काँग्रेसचे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर तयारी करीत आहेत. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला असून विधान परिषदेचे आ. रामराव वडकुते यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे येथे युती व आघाडीतही बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.कळमनुरी मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे सध्या आमदार आहेत. येथे त्यांच्याशिवाय कोणी इच्छुक नाही. मात्र माजी खा. राजीव सातव यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. त्यांनी आधीच नकार दिलेला असतानाही या चर्चा होत आहेत. येथे शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर तयारी करीत आहेत.मात्र मागच्या वेळचे पराभूत सेनेचे माजी आ. गजानन घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खा. शिवाजी माने यांचीही लढण्याची तयारी आहे. ते दोघेही आता भाजपमध्ये असल्याने युती झाल्यास बंडखोरी अटळ आहे.वसमतमध्ये शिवसेनेचे विद्यमान आ. जयप्रकाश मुंदडा पुन्हा इच्छूक असले तरी भाजपचे शिवाजी जाधव यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. ती नाही मिळाली तरीही जाधव मैदानात राहतीलच.राष्ट्रवादीकडून जयप्रकाश दांडेगावकर यांचीही तयारी सुरूआहे. राजू पाटील नवघरेही चर्चेत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात चांगले मतदान वंचित आघाडीला मिळाले आहे. त्यामुळे त्यांचेही उमेदवार राहणार आहेत.>गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारकाँग्रेस-१, राष्ट्रवादी-१, शिवसेना-१सर्वांत मोठा विजय : हिंगोली-तान्हाजी मुटकुळे (भाजप)- ५६४४६ (पराभव : भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेस)सर्वांत कमी मताधिक्याने पराभव: वसमत- जयप्रकाश दांडेगावकर - ५५५६ (विजयी : जयप्रकाश मुंदडा- शिवसेना)
हिंगोलीत आघाडीपेक्षा युतीलाच बंडखोरीचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:58 AM