हिंगोली : मागच्या १५-२० दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत पाय ठेवायला जागा राहात नाही. डेंग्यू, काविळ आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लहान मुलांना उकळलेले पाणी पाजावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, सायंकाळी सात वाजल्यानंतर घराच्या खिडक्या बंद करा, म्हणजे डास घरात येणार नाहीत. मच्छरदानीचा वापर करा. टाकीतील पाणी एक दिवसाआड बदला. भांडी स्वच्छ ठेवा. वातावरणात बदल झाल्यामुळे स्वत:बरोबर लहान मुलांची काळजी घ्या, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
लहान मुलांचे प्रमाण कमी...
व्हायरल फिवरमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत पाय ठेवायलाही जागा राहात नाही. मोठ्या माणसांचे प्रमाण अधिक असून, लहान मुलांचे प्रमाण कमी आहे. अशावेळी लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
रोज १५ रुग्ण...
काविळ, चिकुनगुनिया आणि डेंग्यूसदृश आजाराचे जवळपास १५ रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करून घरी पाठवले जात आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. दवाखान्यात आल्यानंतर मास्कचा वापर करत सामाजिक अंतराचे भान ठेवणे गरजेचे आहे.
काय आहेत लक्षणे...
डेंग्यू : अचानक ताप येणे, खोकला येणे, नाकातून पाणी येणे, अंग दुखणे, डोके दुखणे.
काविळ : भूक न लागणे, मळमळ होणे, अंग दुखणे, डोके जड होणे, पोटामध्ये अचानक दुखणे.
चिकुनगुनिया : गुडघे दुखणे, ताप येणे, अंग दुखणे, पिंढरी दुखणे, अचानक थकवा येणे.
प्रतिक्रिया...
वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. घराच्या आसपास पाण्याची डबकी असतील तर ती जागा कोरडी करून घ्यावी. लहान मुलांची काळजी घ्यावी.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण...
डेंग्यू ७
चिकुनगुनिया ३
काविळ २