हिंगोली : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून आता सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा लग्न जुळविणाऱ्या विविध संकेतस्थळाकडे वळविला आहे. या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन जोडीदार निवडताना सावध राहणे महत्त्वाचे ठरत आहे. अन्यथा हात पिवळे हाेण्याआधीच खिसा रिकामा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोठ्या पगाराची नोकरी असलेला मुलगा जोडीदार म्हणून प्रत्येक मुलीची व तिच्या नातेवाईकांची इच्छा असते. त्यामुळे परदेशात नोकरी करणाऱ्या मुलांकडे मुलीचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा कल असतो. यासाठी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणीही केली जाते. आपली फसवणूक होऊ नये म्हणून नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आदींची माहिती मागविली जाते. परंतु, या माहितीचा गैरवापर करून आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर खोटी माहिती देवून विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून फसवणूक होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे जोडीदार निवडताना प्रत्यक्ष भेटूनच व जोडीदाराची वैयक्तिक माहिती काढूनच विवाह करावेत. अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशी होऊ शकते फसवणूक
१ ) परदेशातून महागडी भेट वस्तू पाठविली आहे. हे गिफ्ट सोडवून घेण्यासाठी तुम्हाला ड्युटी व इतर टॅक्स भरावे लागतील, असा बोगस अधिकाऱ्याचा कॉल येतो. होणाऱ्या पतीने गिफ्ट पाठविले आहे, असे समजून अनेक तरुणी याला बळी पडतात.
२) आपण मोठा डॉक्टर असून परदेशात सैन्यात नोकरी करतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर भारतात मोठे हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी काही खर्च अपेक्षीत असल्याचे सांगून काही तरुणीला फसविल्याचे प्रकार घडले आहेत.
ही घ्या काळजी
-लग्नाचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर वेळीच सावध व्हायला हवे.
-ऑनलाईन ओळखीनंतर प्रत्यक्षात न भेटता अडचणी किंवा अन्य काही बहाणे करून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत असेल तर पोलिसांना माहिती द्या.
- विवाह करण्यास इच्छुक असलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना आपल्या कुटुंबासोबत भेटावे, नोकरी, कुटुंब, राहणीमान याबाबत खात्री करून घ्यावी.
- ऑनलाईन लग्न जुळविणाऱ्या एखाद्या संकेतस्थळावर मागणी आली तर याची सर्वात आधी कल्पना कुटुंबीयांना द्यायला हवी.
-संकेतस्थळावर ओळख झालेल्या पुरुषांबाबतच्या माहितीची प्रत्यक्ष भेटून शहनिशा करायला हवी.
-सोशल मीडिया, मोबाईलच्या माध्यमातून मिळालेली छायाचित्रे त्याच व्यक्तीची आहेत की नाही ते पडताळून पहावे.
सायबर सेल अधिकाऱ्याचा कोट
लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी करताना दिलेल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर चोरटे फसवणूक करण्याची शक्यता असते. त्यामुळे जोडीदार निवडताना शक्यतो प्रत्यक्ष भेटूनच जोडीदाराची निवड करावी. कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये.
- भाग्यश्री कांबळे, सायबर कक्ष प्रमुख, हिंगोली