हिंगोली : आगामी मान्सून ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात १४ मे रोजी मान्सूनपूर्व तयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, राज्य राखीव पोलीस दलाचे महानिदेशक संदीपसिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी म्हणाले, दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. याहीवर्षी अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करावा, या ठिकाणी ॲन्सरिंग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांच्या संपर्क क्रमांकांची यादी तयार ठेवावी. पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्रे त्वरित खरेदी करावीत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून घ्यावेत, पोलीस ठाणेनिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास सादर करावी. तसेच तालुकानिहाय शोध व बचावपथके अद्ययावत करावीत, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जे. के. कांबळे, कृष्णा कांगुले, मयूर खेंगले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, आदींची उपस्थिती होती.
मान्सूनपूर्व करावयाची कामे पूर्ण करा
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पाटबंधारे, नगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण कार्यालयासह रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. १२, गृहरक्षक दल, आदी विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व करावयाच्या कामांबाबत सूचना केल्या. पाटबंधारे विभागाने जलसंस्थाचे सर्वेक्षण करून आवश्यक ती देखभाल-दुरुस्ती करावी, नदीच्या पाणीपातळीचा गावांना धोका पाेहोचू नये याबाबत उपाययोजना करावी; महावितरणने रोहित्रांची, लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करून घ्यावी.
आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करून साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याचे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.