हिंगोली : पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया पार पडली असली तरीही आचारसंहितेमुळे अनेकांना ठाणे बहाल झाले नाही. काही खांदेपालट होणे बाकी आहे. प्रभारींवर चालणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांना बोलावून पोलीस अधीक्षकांनी या व्यवसायापासून दूर राहण्यास सांगत त्यांची धुलाई केली.
हिंगोली जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू व गुटखा विक्रीचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. त्याला जोड म्हणून अवैध वाळू व्यवसायाकडेही मागील काही दिवसांपासून पोलिसांची नजर आहे. मटका, दारू व जुगार याला आळा घालणे हे पोलिसांचे काम आहे. याला लगाम बसत नसल्याचे चित्र आहे. बहुतांश ठाण्यांतून यावर कारवाई होत नसल्याने अनेकदा स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले जाते. मात्र, ही शाखाही ठराविक कारवाया करून राजरोसपणे असे व्यवसाय चालविणाऱ्या काहींकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या भागात मटक्याची पाळेमुळे नव्हती, तेथेही मटका सुरू झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून अशांना जणू अभय मिळत असल्याचे चित्र आहे. केवळ अवैध दारू व वाहन पकडल्याची प्रकरणे नियमित केली जातात.
या सर्व प्रकारांना आळा बसवून वचक निर्माण करण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना बोलावून प्रसाद देण्याची नवी युक्ती नूतन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी रुजू झाल्यानंतर अवलंबिली आहे. या प्रकारामुळे असा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरीही मटका, जुगाराच्या क्षेत्रातील बडे धेंड सोडून भुरट्यांवरच निशाणा साधला जात असल्याचे दिसून येत आहे. या मंडळींच्या छत्रछायेखालीच ही भुरटी मंडळी पाय पसरते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यावर पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार, हा प्रश्नच आहे.
सकाळपासूनच सुरू होती धरपकडआज पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळपासूनच धरपकड करून दारूविक्रेत्यांना आणण्यात आले होते. अवैध विक्री करणारे जवळपास २५ जण आले होते. यापैकी ३ ते ४ जण तर गुंगारा देऊन तेथूनही निघून जाण्यात यशस्वी झाले. काही जण पुढाऱ्यांची नावे सांगून सटकण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, नंतर पोलिसांना त्यांना थांबविताना कसरत करावी लागली. या ठिकाणी फक्त अवैध विक्री करणारेच नव्हे, तर काही बनावट दारू तयार करणारे व विकणारेही पोलिसांनी पकडून आणले होते. सुरुवातीला या सर्वांना नेहमीप्रमाणे पकडणार आणि सोडून देणार असाच समज झाला होता. मात्र, याचा क्लायमॅक्स काय आहे, हे माहिती नव्हते. तो झाल्यानंतर अनेकांना देवळातील देव दिसले.