लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील बसस्थानकातील विविध समस्यांचे निराकरण करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सोडण्यासाठी मंगळवारी पुकारलेले बस रोको आंदोलन राज्य परिवहन विभागाने दिलेल्या लिखित आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येजा करणाऱ्या विद्यार्थिनी व प्रवाशांना येथील बसस्थानकात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही समस्यांचे समाधान होत नसल्यामुळे भाकपचे शेख मुश्ताख यांनी १६ आॅक्टोबर रोजी एस.टी. बस रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने हिंगोली येथील सहाय्यक स्थानकप्रमुख पुंडगे यांनी औंढा येथे येऊन बसस्थानक परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, अवैध पार्किंग, पिण्याचे पाणी व आगार पातळीवरील संपूर्ण समस्यांचे दीड महिन्यांत निराकरण केले जाईल, असे लिखित आश्वासन दिल्यानंतर बस रोको आंदोलन स्थगित घेण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे यांनी बसस्थानकात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. तर येत्या काही दिवसांतच येथे पोलीस मदत केंद्र चालू करून पोलीस गार्ड तैनात करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी किसनराव काशिदे, शेख तुराब, नारायण रणखांबे, मुंजाजी बर्गे आदींची उपस्थिती होती.
भाकपतर्फे आयोजित बसरोको आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:44 AM