दुसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात फारशा उपाययोजना नव्हत्या. दुसऱ्या लाटेपूर्वी त्यातील अनेक बाबींचा जन्म झाला. त्यामुळे या लाटेत पहिल्यापेक्षा चारपट रुग्ण आढळले तरीही यंत्रणा पुरेशी ठरली. तसा काही प्रमाणात खासगीचा आधार घ्यावा लागला. मात्र, तरीही होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्याची वेळ तरी हिंगोली जिल्ह्यावर आली नाही. सर्व रुग्णांना संस्थात्मक उपचार देता आले. आता तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे. हिंगोलीत तशी सुतराम शक्यता दिसत नसली तरीही जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला गती वाढवावी लागेल. लहान मुलांसाठीच्या उपाययोजना मात्र सज्ज आहेत.
७५० ऑक्सिजन बेड तयार
जिल्ह्यात एकूण दहा कोविड सेंटर आहेत. यापैकी सहा सेंटरवर ७५० ऑक्सिजन बेड असून आणखी काही वाढविण्याची गरज पडल्यास यंत्रणा सज्ज करून ठेवण्यात आल्याने हजारावर बेडची व्यवस्था होऊ शकणार आहे.
लहान मुलांसाठी केअर सेंटर
जिल्ह्यात लहान मुलांसाठी जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग, तर वर्षाआतील बालकांसाठी एनआयसीयूचे २५ बेड सज्ज केले आहेत. वसमत व कळमनुरीत प्रत्येकी दहा बेडची तजवीज केली असून काम सुरू आहे.
तीन ऑक्सिजन प्लांट तयार
हिंगोली जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी नियोजन करण्यात आले होते. हिंगोलीत २०० लिटर प्रतिमिनिटाचा एक प्लांट आधीच उभा राहिला आहे.
नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला १०५० लिटर प्रतिमिनिटचा प्लांट आता वीजजोडणीनंतर लगेच कार्यान्वित होणार आहे. नवीन कोविड सेंटरमधील मशीन चार दिवसांत उपलब्ध होणार आहे.
कळमनुरी, वसमत, आखाडा बाळापूर आदी प्लांटच्या निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत. मात्र, पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात तिसरी लाट उद्भवू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ती आलीच तर त्यासाठी आरोग्य यंत्रणेचे आवश्यक सक्षमीकरण करण्यात आले. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर वाढविले. लहान मुलांसाठी विशेष कोरोना केअर सेंटर उभारले आहे. ऑक्सिजन प्लांटही उभे राहिले आहेत. अजूनही काही कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्ण होतील, हा विश्वास आहे.
-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी
पहिली लाट
एकूण रुग्ण १२०३
बरे झालेले ११४५
मृत्यू ५८
दुसरी लाट १४७६०
बरे झालेले १४४३०
मृत्यू ३३०
४.३ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण
एकूण लसीकरण २४२८४१
पहिला डोस १९९६५५
दुसरा डोस ४३१८६