लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथील नवीन राष्टÑीय महामार्ग क्र. ३६१ मध्ये हायवेलगत असलेल्या घरकुलांच्या मंजूर झालेल्या मावेजा रकमेत अनियमतता करून चौकशीची मूळ संचिका जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आल्याची तक्रार १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लाभार्थ्यांनी केली. त्यामुळे कळमनुरी येथील संबधित एसडीएम तथा भूसंपादन अधिकारी प्रशांत खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सदर जमीन राष्टÑीय महामार्ग क्र.३६१ करीता भूसंपादित करण्यात आली. त्याप्रमाणे मावेजा देण्यात येत असला तरी मागील दोन वर्षांपासून लाभार्थ्यांना मावेजा मिळाला नाही. सातबारावरीही पूर्वीचीच नोंद आहे. मावेजा रक्कम देण्याकरीता आक्षेप अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल असल्यामुळे मावेजाची रक्कम शासन दरबारीच आहे. हक्काची रक्कम देण्याकरीता संबधित प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. शिवाय लाभार्थ्यांकडील संपूर्ण कागदपत्रेही जमा करून घेतले आहेत. त्यानंतर कार्यालयातील चौकशी संचिकेची मूळ फाईलही गहाळ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबधित दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या पंधरा दिवसांत योग्य कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला.निवेदनावर सरवनखाँ पठाण, पाशाखाँ पठाण, शे. मजहर, गोदावरी मगरे, शंकर गोखणे, सदानंद गोखणे, संतोष गोखणे, शे. अफसर, शंकर घुगे, व लाभार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.तर ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रशांत खेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
भूसंपादनापासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:05 AM