लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिकेने जवळपास तीनशे घरकुलांच्या कामांना मंजुरी दिली असून यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. यात काहींचा पहिलाच हप्ता रखडला असून काहींचे पुढील हप्ते मिळत नसल्याने नगरपालिकेच्या चकरा मारून लाभार्थी हैराण असल्याचे चित्र आहे.यंदा हिवाळ्यात लाभार्थ्यांनी ही कामे सुरू केली. तोडका-मोडका संसार इतरत्र हलवून कामे सुरू केल्यानंतर छत लेव्हलला आलेल्या कामाची पुढील रक्कम आधी शासनाकडून आली नसल्याने मिळत नव्हती. तर आता पालिकेकडे निधी आला तरीही ती मिळत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकेत लाभार्थी चकरा मारून हैराण आहेत. त्यांना निधीच नसल्याचे कारण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आधी सांगितले जात होते. आता ते जणू पाठ केल्यासारखे सगळेचजण सांगत आहेत. काही दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी तर मालमत्ता करवसुलीच्या कामात एवढे गुंतले की, लाभार्थ्यांना घरकुल कक्षातील कंत्राटी कर्मचाºयांशिवाय कोणीच भेटत नाही. विशेष म्हणजे काहीजण २ कोटी रुपयांचा निधी येवून पडल्याचे सांगत आहेत. मात्र पालिकेतील पदाधिकारी व अधिकाºयांनाही त्याची माहिती नसल्याने एकच कित्ता गिरवणे सुरू आहे. आम्हाला कोणीतरी वाली आहे की नाही, असा सवाल लाभार्थी करताना दिसत आहेत. त्यांना जुजबी कारण सांगून परत केले जात आहे.काही लाभार्थ्यांना आधीच अपुरी जागा असल्याने त्यांनी पालात संसार थाटला आहे. एकतर घरकुलाचेही काम रखडलेले आहे अन् पुढील काम करायला रक्कमही मिळत नाही. मुले-बाळे उघड्यावर थंडीत कुडकुडत दिवस काढत आहेत. पक्का निवारा होण्याच्या अपेक्षेने हे हाल सोसण्याची वेळ येत आहे.
घरकुलाच्या लाभार्थ्यांची होतेय दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:41 AM