हिंगोली : कोरोना महामारीप्रमाणेच डेंग्यूचाही व्हायरस आता बदलत आहे. त्यामुळे त्याची वेगळी लक्षणे समोर येत असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात जानेवारीपासून सेंटिनल प्रयोगशाळेत ८७ रक्तजल नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले, त्यापैकी २ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले. ७९ गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या मागणीप्रमाणे धूर फवारणीही करण्यात आली. नगरपालिकांमार्फत संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली. जिल्ह्यातील २५ धूर फवारणी यंत्रे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली आहेत. त्यामुळे तत्काळ धूर फवारणी करणे सोयीचे झाले आहे. डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढू नयेत म्हणून पावसाळा सुरु होण्यापूर्वी जिल्ह्यात घरोघरी विशेष ॲबेटिंगचे २ राऊंड घेण्यात आले. सध्या संपूर्ण जिल्ह्यात गप्पी मासे पैदास केंद्र तयार करुन त्यामध्ये गप्पी मासे सोडण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत नियमित कंटेनर सर्वेक्षण व ॲबेटिंग करण्यात येत आहे.
जानेवारी ते ऑगस्ट २
रोज डेंग्यूसदृश्य आढळणारे रुग्ण ०४
२४ सप्टेंबर रोजी २ नमुने पाठवले तपासणीला
काहींना येतो ताप...
काही रुग्ण असे असतात की, त्यांना ताप येतो. परंतु, उपचार केल्यानंतर तो कमी होतो. त्यांना लगेच घरी सोडूनही दिले जाते. पावसाळ्याचे दिवस असल्याने घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी, पाण्याचे डबके साचले असेल तर जी जागा कोरडी करावी.
पॅथॉलॉजिस्ट काय म्हणतात...
ताप येणे व प्लेटलेट्स कमी होणे ही डेंग्यूचे लक्षणे असू शकतात. अशावेळी रुग्णांनी ताप अंगावर काढू नये. लगेच फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रोजच्या रोज रक्तजल नमुने परभणी येथे तपासणीसाठी पाठविले जातात. शुक्रवारी २ रक्तजल नमुने परभणी येथे तपासणीसाठी पाठविले.
- डॉ. सुनील पाटील, पॅथॉलाॅजिस्ट
रोगांची सर्वसाधारण चिन्हे, लक्षणे...
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे इ. रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात.
प्रतिक्रिया
रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्या पुरळावरुन केली जाते. नाकातून, हिरड्यांतून ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात. सद्यस्थितीत डेंग्यूसदृ्श्य रुग्ण आढळून येत असून, त्यांच्यावर योग्यरित्या उपचार करुन त्यांना घरी पाठविले जात आहे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक