कोरोनामुळे लोकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे वाढला आहे. सोशल मीडियावर अगदी सांसारिक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॅानिक वस्तूंच्या जाहिराती येत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन पेमेंटद्वारे पैसे भरून वस्तू १० ते ४० टक्के सूट देऊन घरपोच पोहोचविण्याची ऑफर दिली जाते. मात्र,
अनेक वेळा सायबर चोरट्यांकडून विविध नामांकित कंपन्यांचा लोगो वापरून, नाव वापरून लिंक तयार केली जाते. ती लिंक व्हॅाट्सॲप किंवा फेसबुकवर पाठविली जाते. फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूट असल्याचे सांगितले जाते. परंतु संबंधित लिंक बनावट असते. भरलेले पैसे तर वाया जातातच, शिवाय वस्तूही मिळत नाही. तर काही वेळा पैसे भरूनही वस्तू न येणे, मागविलेल्या वस्तूऐवजी दुसरी वस्तू येणे, खराब वस्तू पाठविणे असे प्रकार होत असतात. यातून अनेकांची हजारो रुपयांची फसवणूक होत असते.
ही घ्या काळजी
- कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरच वस्तूंची मागणी नोंदवा. ऑनलाइन पैसे भरताना सर्व बाबींची पडताळणी करा. त्यासाठी आधी कमी रक्कम ऑनलाइन भरा, ती यशस्वीरित्या वर्ग झाली तर पुढील रक्कम वर्ग करा. जेणेकरून मोठ्या रक्कमेची फसवणूक टळू शकते.
- कुठलीही कंपनी २० ते २५ टक्केपेक्षा अधिकच्या सूटची ऑफर देत नाही. त्यामुळे ३० ते ५० टक्के फेस्टिव्हल ऑफरला बळी पडू नका. शक्यतो अशा कंपन्या बनावट असतात.
अशी होऊ शकते फसवणूक
१) एखाद्या नामांकित कंपनीकडून गिफ्ट आले आहे. असे सांगून सायबर चोरटे मेसेज पाठवितात. या मेसेजवर जाऊन वैयक्तिक माहिती आणि बँकेची माहिती भरण्यास सांगितली जाते. तसेच समोरील व्यक्ती ओटीपी विचारतो. यातून खात्यातून रक्कम काढून घेतली जाते.
२) फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली वस्तूंवर मोठी सूट दिली जात असल्याचे भासविले जाते. वस्तू घरी आल्यानंतर पैसे द्या, असे सांगितले जाते. त्यानुसार मागविलेली वस्तू घरी येते. वस्तू घेण्याच्या गडबडीत आपण वस्तूचे पैसे देऊन टाकतो. मात्र त्यानंतर बॉक्समध्ये मागविलेली वस्तूच नसते. यातून फसवणूक होण्याची शक्यता असते.
फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरच वस्तूची मागणी नोंदवावी. तसेच शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन निवडावे. वस्तू घरी आली तरी मागविलेलीच वस्तू आहे की नाही, ते तपासूनच वस्तूचे पैसे द्यावेत.
- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली