हिंगोली : बनावट फेसबुक प्रोफाइल बनवून फ्रेंड्स यादीतील मित्र-मैत्रिणीला तसेच नातेवाइकांना पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून मोठी फसवणूक होत असून फेसबुकवरून पैशाची मागणी झाल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
आज प्रत्येकाकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल आला आहे. मोबाइलवर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ई-मेल, फोन पे, गुगल पे आदींचा ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑनलाइनमुळे जगातील प्रत्येक माहिती एका क्लीकवर मिळत आहे. ॲप डाऊनलोड करताना सुरक्षाही बाळगली जात असली तरी फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. यापूर्वी अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. ओटीपी क्रमांक मागवून फसविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात सायबर सेलकडे २०२० या वर्षात १६ तर २०२१ मध्ये ३ असे दीड वर्षात १९ तक्रारी आल्या आहेत. यात फसवणुकीचे २०२० मध्ये ३ तर २०२१ मध्ये २ प्रकार घडले आहेत. यातील एका प्रकरणाचा उलगडा करण्यात सायबर सेलच्या पथकाला यश आले आहे. दरम्यान, आता तर फेसबुकच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फेसबुकवरून पैशाची मागणी झाल्यास तात्काळ फेक अकाउंट शोधून ते डिलिट करावे अथवा स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर सेल कक्षाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर
-एखाद्याची फेसबुक प्रोफाइल फेक बनवून त्यांच्या मित्र-मैत्रीण, नातेवाइकांना आजार व इतर कारणे सांगून पैसे मागितले जात आहेत.
-विशेष म्हणजे ज्यांच्या नावाने बनावट अकांऊट बनविले आहे. त्याला याची कल्पनाही नसते. मित्राने कल्पना दिल्यानंतर हा प्रकार समोर येतो.
- परिचित व्यक्तीच्या नावाचा वापर करीत फेसबुकवरून पैसे मागण्याचे प्रकार वाढत आहेत.
अशी घ्या काळजी
ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबुक लिंक (यूआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाइलवर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट (.) वर क्लिक करा. तुमच्या नावासमोर फर्स्ट सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाइल हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्रिटिंडिंग टू बी समवन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शनपैकी मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी ही ऑप्शन दिसतील. आपलीच बनवलेली फेक प्रोफाइल रिपोर्ट करत असल्यास मी अथवा मित्राची फेक प्रोफाइल रिपोर्ट करत असल्यास अ फ्रेंड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्ट करा. थोड्यावेळाने फेक प्रोफाइल अकाउंट बंद होईल.
परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर
फेसबुकवरून पैशाची मागणी करताना सायबर चोरटे परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर करीत आहेत.
ओटीपीची मागणी करून अथवा फेसबुकवरून फसवणूक केली जात आहे. ओटीपीची मागणी करून अथवा फेसबुकवरून पैशाची मागणी होत असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे अथवा सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली